पन्हाळा
भौगोलिक स्थान आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे. इतिहास: पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते. व पाली भाषेतील आहे. येथून सम्राट अशोकाने शिक्षणाचा प्रसार केला. मार्च २१६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून -आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. ६ मार्च १६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे राजवाडा हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे. सज्जाकोठी- राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबते येथेच चालत. राजदिंडी ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले. अंबरखाना- अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ होती. चार दरवाजा- हा पूर्वेकडील अत्यंत मोक्याचा व महत्त्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा इंगजांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच "शिवा काशीद यांचा पुतळा आहे. सोमाळे तलाव- गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्र मावळ्यांनी लक्ष चाफ्याची फुले वाहिली होती. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी-सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची. रेिडे महाल- याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते, त्यास रेडे महाल म्हणतात. वस्तुतः ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत. संभाजी मंदिर- ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.
धर्मकोठी- संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते, ती धर्मकोठी. सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत. अंदरबाव- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे, तर मधला मजला हा चांगला ऐसपेस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो. महालक्ष्मी मंदिर - राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय. तीन दरवाजा- हा पश्चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला. बाजीप्रभूंचा पुतळा- एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे. गडावरील राहायची सोय गडाच्या जवळपास राहण्यासाठी निवासस्थाने व हॉटेल्स आहेत. गडावरील खाण्याची सोय जेवणाची सोय निवासस्थानांमध्ये होते. येथील झुणका-भाकरी सुप्रसिद्ध आहे. मार्ग जाण्यासाठी लागणारा वेळ कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास लागतो. कोल्हापुरातील शिवाजी पुतळा kmt बस स्टैंड येथुन kmt बस मधुन पन्हाळा तीन दरवाजा येथे अर्ध्या तासात पोहचते.