कोंडाजी फर्जंद
अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय. तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते. पण दख्खनचा दरवाजा
असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १७७२ रोजी रायगडावर आपल्या सहकार्यांनना ही सल बोलून दाखविली. यावेळी कोंडाजी फर्जंद, राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम (मावळे)राजेंकडे मागितले. अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले. कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला. राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने (जंगली रस्त्याने) अंदाजे ८०-९० कि.मी होते. हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली. गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते. बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.
फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि. ६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला. तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला. तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला. मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली. गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले. अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले. किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले. पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला. अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.