पंत अमात्य (मजुमदार)
रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता. रामचंद्र नीळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्रपंत अमात्य (१६५०-१७१६) हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते.
रामचंद्रपंत अमात्यांची साथ केवळ शिवाजीराजेच नव्हे तर संभाजीराजे, राजाराम आणि ताराबाईंना लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेली राजनीती अमात्यांनी आपल्या उत्तरायुष्यात लिहून काढली. तसेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या आज्ञेने त्यांच्या राजकुमारांना राज्यकारभाराचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 'आज्ञापत्र' हा ग्रंथ लिहिला.