Rajyabhishek(राज्याभिषेक)
11 February 2023

Rajyabhishek(राज्याभिषेक)


शिवाजी भोसले

हे अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे शिवरायांना त्यांच्या साथीदारांना जाणवत होते.
शिवाजीराजांनी अनेक जमिनींवर स्वामित्व स्थापन केलेले असले आणि अपार धन मिळविले असले तरी; त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल असले आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असला तरी सैद्धांतिकदृष्ट्या त्यांची स्थिती ही राजासारखी किंवा सम्राटासारखी नव्हती. मुघल सम्राटाच्या लेखी ते एक जमीनदार होते; आदिलशहासाठी ते एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते.


तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.


गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहितीशिवराज्याभिषेक कल्पतरू' नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे कीगागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.” त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज- गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा. कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.