सुरतेची पहिली लूट
इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे, अन्याय्य कर लादून किंवा -बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. -आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली सामान्यपणे पुणे जिल्हा, मध्य आणि दक्षिण कोकण आणि सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश होते. मोगल महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेले होते. त्यांना जबर धक्का द्यावा म्हणून शिवाजी महाराजांनी आणखी एक सुरत लुटीचा धाडसी उपक्रम योजला. त्याकाळी सुरत मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर होते. मोगलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चाले. यूरोपीय तसेच इराणी, तुर्की व अरब यांच्या जहाजांची तेथे नेहमीच वर्दळ असे. मध्य आशियातून मक्केच्या यात्रेला जाणारे यात्रेकरू याच बंदरातून पुढे जात. सुरतेस लक्षाधीश धनिकांच्या मोठमोठ्या पेढ्या होत्या. महाराजांनी कल्याण, भिवंडी, डांग या भागांतून पोर्तुगीज हद्दीच्या बाजू-बाजूने सरकत सुरत गाठले. मराठे सुरतेच्या अगदी जवळ येईपर्यंत मोगल अधिकाऱ्याना त्यांचा पत्ता लागला नाही, हल्ला होताच तेथील मोगल अधिकारी किल्ल्यात जाऊन बसला, तो शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही. चार दिवस मराठ्यांनी सुरतेची लूट केली (६ ते ९ जानेवारी १६६४). मोगलांचा सगळा प्रतिकार त्यांनी हाणून पाडला. इंग्रज, डच इ. यूरोपीय व्यापाऱ्यांनी आपापल्या वखारींचे संरक्षण करण्याच प्रयत्न केला.
मराठे त्यांच्या वाटेला गेले नाहीत. सुरतेच्या लुटीतील हाती सापडलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इ. मिळून एक कोटीच्या आसपास होती. अहमदाबाद आणि मोगल राज्यांतील इतर भागांतून सैन्य चालून येत आहे, अशी वार्ता लागताच महाराजांनी सुरत सोडले आणि संपत्ती घेऊन ते सुरक्षितपणे स्वराज्यात परतले. महाराजांच्या सुरतेवरील या स्वारीचे तपशीलवार वर्णन यूरोपीय वखारवाल्यांच्या कागदपत्रांतून आढळते. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव परदेशातही चर्चिले जाऊ लागले. सुरतेहून आणलेल्या लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधूदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा विस्तार केला. याची सुरवात त्यांनी कल्याण-भिवंडी घेऊन यापूर्वीच सुरू केली होती (१६५७). पश्चिम किनाऱ्याचे रक्षण आणि आरमाराला सुरक्षितता या हेतूने शिवाजी महाराजांनी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधले.
यूरोपीयांच्या राजकीय डावपेचावर महाराजांचे सतत लक्ष असे. जंजिऱ्याच्या सिद्दीला इंग्रज आणि पोर्तुगीज मदत करतात, हे ते जाणून होते. इंग्रजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात (१६६०) सिद्दी जोहरला दारुगोळ्याची मदत केली होती. याबद्दल शिक्षा म्हणून महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून त्यांचे काही अधिकारीही कैद केले होते. इंग्रजांनी मोठे प्रयत्न करून त्यांची सोडवणूक केली; तेव्हा आदिलशहाने दक्षिण कोकण घेण्यासाठी अझीझखानाच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले. अझीझखान आणि वाडीचे सावंत एक झाले, परंतु अझीझखान मरण पावल्यामुळे (१० जुलै १६६४) आदिलशहाने खवासखान याला पाठविले. तेव्हा महाराजांनी वेंगुर्ल्यावर हल्ला केला आणि कुडाळ येथे ते खवासखानावर चालून गेले (ऑक्टोबर १६६४). खवासखानाने निकराने प्रतिकार केला आणि विजापूरकडे तातडीची मदत मागितली. ती मदत घेऊन मुधोळचा बाजी घोरपडे येत असता मराठ्यांनी त्याला गाठले. या -लढाईत बाजी घोरपडे जखमी झाला आणि पुढे लवकरच मरण पावला. त्याजकडील खजिना मराठ्यांनी लुटला. बाजी घोरपड्याची सु. दोनशे माणसे ठार झाली. घोरपड्याच्या मृत्युनंतर खवासखानही पराभूत होऊन निघून गेला (डिसेंबर १६६४). विजापूरकरांची ही मोहीम म्हणजे कोकण ताब्यात ठेवण्यासाठी आदिलशहाने केलेला शेवटचा प्रयत्न होय. त्यानंतर कोकणात मराठ्यांची सत्ता निर्वेध चालू राहिली.